बारामती, 23 एप्रिलः नगरपरिषद, नगरपंचायत मधील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत आणि संवर्ग कर्मचारी संघटना यांच्या वतीने मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री, नगर विकास सचिव, आयुक्त तथा संचालक नगर पालिका प्रशासन मुंबई यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहे.
यात राज्यातील नगर परिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन कोषागारातून व्हावे, नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे समावेशन सरसकाट व्हावे, सफाई कर्मचाऱ्यांची पदे वाढवून ठेकेदारी पद्धत बंद करावी, नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध करून वेतनश्रेणीत वाढ करावी, राज्यसेवा संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी एकसमान करावी, यात स्वच्छता निरीक्षक, कर व प्रशासकीय सेवा, अग्निशमन सेवा यांची वेतनश्रेणी 2800 रुपयांवरून 4200 रुपये करावी, संवर्गातील कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी तात्काळ प्रसिद्ध करून ज्येष्ठतेनुसार रखडलेल्या पदोन्नत्या तात्काळ द्याव्यात, मुख्याधिकारी पदावर संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी देण्यासाठी 10 टक्के ऐवजी 50 टक्के अशी पदनिर्मिती करावा, आदी प्रमुख मागण्यांसह इतर 37 मागण्यांचा समावेश आहे.
हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या प्रतीक असलेल्या उरूसाला सुप्रिया सुळेंची हजेरी
कास्ट्राईब संघटना, बारामती नगर परिषद यांच्या वतीने या मागण्याचे निवेदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना देण्यात आले. निवेदन देते वेळी आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, सुनिल धुमाळ, गायकवाड, फिरोज शेख, पवार मॅडम, चव्हाण मॅडम, संतोष तोडकर आदी कर्मचारी उपस्थित होते. तसेच मागण्या मान्य न झाल्यास येत्या 2 मे 2022 पासून बारामती नगर परिषदेचे सर्व कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनाला बसणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
‘नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार हे शासनाने करावेत, लागू केलेल्या 7 व्या वेतन आयोगाचा फरक तात्काळ कर्मचाऱ्यांना द्यावा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतननुसार पगार द्यावा’- राजेंद्र सोनवणे (आरोग्य निरीक्षक, बारामती नगर परिषद)
‘नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना देखील पदोन्नती द्यावी, अनुकंपानुसार कर्मचाऱ्यांना तात्काळ नोकरीवर घ्यावे’- सुनिल धुमाळ (वरिष्ठ लिपीक, बारामती नगर परिषद)