बारामती, 18 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत पुणे विभागातील अ, ब, क वर्ग नगरपरिषदांमध्ये बारामती नगरपरिषदेने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. महेश रोकडे, नगपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. यासंदर्भात अजित पवार यांनी एक पत्र लिहिले आहे.
देशातील प्रगत नगरपरिषदांमध्ये बारामती नगरपरिषदेचा समावेश होतो: अजित पवार
“बारामती नगरपरिषदेने नगरविकासाच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. राज्यातील, देशातील प्रगत, उपक्रमशील नगरपरिषदांमध्ये बारामती नगरपरिषदेचा समावेश होतो. बारामती नगरपरिषदेत वेळोवेळी प्रतिनिधित्वं करणाऱ्या स्थानिक नेतृत्वाची दूरदृष्टी, विकासाप्रती बांधिलकी तसेच नागरिकांच्या एकजुटीच्या सहकार्यामुळेच बारामती नगरपरिषदेला सर्व क्षेत्रात सातत्यपूर्ण प्रगती करणे, यश मिळवणं शक्य झालं आहे. ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा – 2023’ मधील यश हे सुद्धा सातत्यपूर्ण यशस्वी कामगिरीतील महत्वाचा टप्पा आहे. या यशाबद्दल मी पुन्हा एकदा शहरातील स्थानिक नेतृत्वाचं, बारामती शहरवासियांचं अभिनंदन करतो,” असे अजित पवार यावेळी म्हणाले.
बारामतीकरांमध्ये एकजूट होऊन कष्ट करण्याची भावना!
“देशात ‘विकासाचे मॉडेल’ अशी बारामतीची ओळख आहे. ही ओळख अधिक ठळक होण्यामागे बारामतीकरांमध्ये असलेला विकासाचा ध्यास, त्यासाठी एकजूट होऊन कष्ट करण्याची भावना प्रमुख आहे. विकासाच्या प्रत्येक कार्याला शहरवासियांकडून मिळणारं सहकार्य, स्थानिक नेतृत्वाकडून विकासाबद्दल दाखविली जाणारी बांधिलकी, शहर प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांचे परिश्रम, याच्या एकत्र परिणाम स्वरूप बारामती शहराचा विकास वेगाने होतो आहे,” अशा शब्दांत अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले.
“विकासाचा हा वेग कायम ठेवण्यासाठी, ‘विकासाचे मॉडेल’ ही बारामतीची ओळख सातासमुद्रापार, जगभर पोहचवण्यासाठी यापुढच्या काळात आपण सर्वजण एकदिलानं, एकजुटीनं, सर्वशक्तिनिशी प्रयत्न करुया, बारामती शहराला अधिक स्वच्छ, अधिक सुंदर, अधिक सक्षम बनविण्यासाठी दृढसंकल्प करुया, असं आवाहन करतो. ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा – 2023’ मध्ये मिळालेल्या यशाबद्दल सर्वांचे पुनःश्च अभिनंदन.” असे अजितदादा पवार यांनी या पत्रात म्हटले आहे.