बारामती नगरपरिषदेची वसुली मोहीम; थकीत कर न भरल्यास कारवाईचा इशारा

बारामती नगरपरिषदेची कर वसुली मोहीम

बारामती, 08 मार्च: बारामती नगरपरिषदेच्या हद्दीतील मालमत्ताधारकांकडून 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर, गाळेभाडे तसेच पाणीपट्टीच्या वसुलीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार, थकीत आणि चालू बाकी असलेल्या मालमत्ताधारकांनी त्वरित कर भरणा करावा, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

अन्यथा 2 टक्के व्याज आकारणार!

महाराष्ट्र नगरपरिषदा व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 नुसार, मालमत्ताधारकांनी थकीत तसेच चालू मालमत्ता कर, गाळेभाडे आणि पाणीपट्टीची संपूर्ण रक्कम भरणे आवश्यक आहे. जे मालमत्ताधारक दिलेल्या मुदतीत कर भरू शकणार नाहीत, त्यांच्या थकीत मागणीच्या रक्कमेवर दरमहा 2 टक्के व्याज आकारण्यात येणार आहे. त्यामुळे अतिरिक्त आर्थिक भार टाळण्यासाठी नागरिकांनी लवकरात लवकर थकीत मालमत्ता कर, गाळेभाडे आणि पाणीपट्टी कर भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कठोर कारवाईचा इशारा

कर भरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांवर कठोर कारवाई करण्याचे नियोजन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. त्यामध्ये मालमत्ता आणि गाळे सील करून नगर परिषदेच्या ताब्यात घेणे, पाणीपुरवठा कनेक्शन तोडणे, तसेच संबंधित मालमत्ताधारकांची नावे शहरातील प्रमुख चौकांमध्ये जाहीर करणे यांसारख्या कारवाया करण्यात येणार आहेत.

कर भरण्यासाठी सोयीस्कर पर्याय

या पार्श्वभूमीवर, सर्व मालमत्ताधारकांनी कारवाई टाळण्यासाठी आपला थकीत व चालू कर तत्काळ नगर परिषद कार्यालयात भरावा आणि नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार, बारामती नगर परिषदेच्या वतीने कर भरणा करण्यासाठी नागरिकांना सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिक घरबसल्या BRMTAX अ‍ॅप किंवा बिलावरील QR कोड स्कॅन करून आपला कर भरू शकतात. तसेच नगरपरिषद कार्यालय जळोची रुई व तांदुळवाडी क्षेत्रीय कार्यालय आणि अग्निशमन केंद्र येथेही कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे, असे बारामती नगर परिषदेने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *