बारामती, 02 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) बारामती नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत बारामती शहरामधील दिव्यांग नागरिकांसाठी दरवर्षी त्यांना सहाय्यभूत होतील, अशा विविध योजना राबविल्या जातात. त्यानुसार, सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बारामती नगरपरिषद हद्दीतील पात्र दिव्यांग नागरिकांनी परिपूर्ण अर्ज भरावा. त्यानंतर त्यांनी हे अर्ज महिला व बालकल्याण विभागाकडे दिनांक 30 ऑगस्ट 2024 पर्यंत जमा करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.
दिव्यांग नागरिकांसाठी महत्वपूर्ण योजना
बारामती नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत बारामती नगरपरिषद हद्दीतील पात्र दिव्यांग नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात. यामध्ये दिव्यांग स्वयंरोजगार अर्थसहाय्य योजना यामध्ये लाभार्थ्यांना 10 हजार रुपयांचा लाभ मिळतो. उदरनिर्वाह भत्ता योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी नागरिकांना वार्षिक 6 हजार रुपयांचा लाभ मिळतो.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना
याशिवाय, बारामती नगरपरिषदेकडून दिव्यांग शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा दिव्यांग विद्यार्थ्यांना होणार आहे. दरम्यान, या योजनेचा लाभ एकाच वेळी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत इयता 1 ली ते 9 वी पर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना 4 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. इयत्ता 10 वी ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकावेळी 8 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. पदव्युत्तर पदवी तथा समकक्ष अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. उच्च शिक्षण किंवा पीएचडी, एमफिल तथा समकक्ष अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना 25 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय ते आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा प्रकारात सहभागी झालेल्या विजयी दिव्यांग विद्यार्थ्यांना 20 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.