बारामती, 28 जानेवारी: बारामती येथे आज (दि.28) सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी पवार कुटुंबीय आणि खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.
https://x.com/i/status/2016469777867592133

तत्पूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या आज बारामती तालुक्यात चार जाहीर सभा होणार होत्या. त्यासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे येत असताना त्यांचे चार्टर्ड विमान लँडिंगदरम्यान कोसळले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

उद्या 11 वाजता अंत्यसंस्कार
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण यांनी सांगितले की, अजित पवार यांचे पार्थिव आज जनतेच्या अंतिम दर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान मैदानावर ठेवण्यात येणार आहे. उद्या (दि.29) सकाळी अकरा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर, बारामती परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जनतेशी थेट नाते असलेला, रोखठोक आणि अनुभवी नेता महाराष्ट्राने गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत असून, बारामती सध्या शोकसागरात बुडाल्याचे चित्र दिसत आहे.

