बारामती बाजार समितीत शासकीय उडीद व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

बारामती, 08 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीने 2024-2025 या हंगामात केंद्र सरकारचे हमीदर खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव दि. 09 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा उपनिबंधक आणि पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार केंद्र सरकारने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेड मार्फत मुग, उडीद व सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र बारामती साठी मंजूर झाले असून, त्यासाठी शेतकरी नाव नोंदणी प्रक्रिया दि. 01 ऑक्टोबर 2024 च्या पत्रानुसार सुरू झाली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती सुनिल पवार व उपसभापती निलेश लडकत यांनी यावेळी दिली.



सदर केंद्रावर नाफेड मार्फत सोयाबीन प्रति क्विंटल 4 हजार 892 रुपये व उडीद 7 हजार 400 रुपये आणि मुग प्रति क्विंटल 8 हजार 682 या हमीदराने शासन खरेदी करणार आहे. सध्या मुग, उडीद व सोयाबीन काढणी हंगाम सुरू झाला असून, बाजार आवारात नवीन शेतमालाची आवक सुरू झाली आहे. बाजार आवारात मागणी व पुरवठा त्यानुसार दर निघतात. वाळलेला व स्वच्छ सर्वसाधारण दर्जाचा माल हमीदराने विक्रीची सोय करावी म्हणून बाजार समितीने सरकारकडे मागणी केली होती. सदर केंद्र सुरू झाले असल्याने शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन बारामती बाजार समिती तर्फे करण्यात आले आहे.



या केंद्रावर शेतकऱ्यांनी नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करावयाची असल्याने नाव नोंदणी करण्यासाठी प्रचलित पद्धतीनुसार शेतकऱ्यांनी जो शेतमाल विक्री करायचा आहे, त्याची नोंद असलेला सन 2024-25 पिकपेरा सहीत 7/12 उतारा, आठ-अ, आधारकार्ड आणि IFSC कोड सह बँकेचे पासबुक झेरॉक्स, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. सरकारने दिलेल्या कालावधी नुसार दि. 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंत शेतकऱ्यांनी बारामती शहरातील तिन हत्ती चौक येथील बाबालाल काकडे निरा कॅनॉल संघ (प्रशांत मदने) येथे नाव नोंदणी करायची आहे.

बारामती मुख्य यार्ड येथे प्रत्यक्ष खरेदी केंद्र ऑनलाईन नाव नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल दि. 15 ऑक्टोंबर 2024 पासून समितीचे यांत्रिक चाळणी येथे खरेदीस सुरूवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल खरेदी केंद्रावर आणताना सरकारच्या निकषाप्रमाणे एफ.ए.क्यु. दर्जाचा व स्वच्छ आणि वाळवून आणावा, असे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *