बारामती, 17 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बारामती येथे ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने ‘कृषिक-2025’ या भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा आज (दि.17) दुसरा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच या प्रदर्शनाला भेट दिली. शेतीमध्ये एआय, ड्रोन, स्वयंचलित तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या प्रगत पद्धतींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवी दिशा देण्याचा या प्रदर्शनाचा उद्देश असल्याचे पवारांनी सांगितले. हे कृषिक प्रदर्शन बारामतीच्या माळेगाव खुर्द येथील कृषी विज्ञान केंद्रात सुरू झाले असून ते 20 जानेवारीपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाला नक्की भेट देऊन आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी, असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.
https://x.com/RRPSpeaks/status/1880137059811356970?t=n3FdWxc2hp7V7I44-tcCyA&s=19
प्रदर्शनातील पशुधनाचे आकर्षण
यावेळी रोहित पवार यांनी कृषिक प्रदर्शनातील पशुधन तसेच फळे, फुले, भाजीपाला यांचे विक्रमी उत्पादन घेऊन जास्त नफा कसा कमावता येईल? याचे प्रात्यक्षिक पाहून माहिती घेतली. प्रदर्शनातील आकर्षणांमध्ये 11 कोटी रुपये किमतीचा मारवाडी जातीचा घोडा, 1 कोटी रुपये किमतीचा आणि 1500 किलो वजनाचा कमांडो नावाचा रेडा, रामा आणि रावण नावाचे 1 कोटी रुपयांची लाल कंधारी बैलजोडी, दुर्मिळ बन्नूर जातीची मेंढी आणि हैदराबादचे नवाब हसन बिन त्रिफ यांचा घोडा यांचा समावेश आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.
दुर्मिळ पिके व तंत्रज्ञान
त्रिस्तरीय पशुपालन युनिट, काळा टोमॅटो, काळी मिरची, काळा कांदा यांसारखी दुर्मिळ पिके, 40 फुटांपर्यंत वाढणारा फुले जातीचा टोमॅटो, एआयच्या मदतीने एकरी 120 ते 140 टन उत्पादन देणारा ऊस, जर्मनी व जपानमधील कट फ्लॉवर पिके, डाळिंबाचे सुधारित वाण, कृषी विज्ञान केंद्राने विकसित केलेला रत्नदीप हा पेरूचा वाण, बुलेट द्राक्ष वाण, देशी भोपळ्याचे 13 प्रकार, टोमॅटोचे 29 देशी वाण यांसह अनेक देशी-विदेशी फळे व फुलांच्या नवीन जातींचे प्रदर्शन हे या कृषिक प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार आहे, याची माहिती ही रोहित पवारांनी दिली आहे.