बारामती, 19 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बारामती जवळ माळेगाव खुर्द येथील कृषी विज्ञान केंद्रात 16 ते 20 जानेवारी या कालावधीत कृषिक 2025 हे भव्य कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 170 एकरांवर उभारलेल्या या प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, नवे बियाणे, खते, नाविन्यपूर्ण शेती अवजारे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे शेती पद्धती, फळझाडांची लागवड, विविध पिकांचे वाण आणि अन्य तंत्रज्ञानांची प्रात्यक्षिके दाखवण्यात येत आहेत. त्याचबरोबर या कृषिक 2025 प्रदर्शनात कमांडो नावाचा रेडा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
कमांडो रेडा आकर्षणाचा केंद्रबिंदू
यंदा प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे स्वतंत्र पशुदालन विभाग. येथे कमांडो नावाचा 1500 किलो वजनाचा रेडा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी सांडस येथील शिंदे डेरी फार्मचे अमित शिंदे यांचा हा रेडा असून त्याची किंमत 1 कोटी रुपयांच्या घरात आहे. अवघ्या तीन वर्षांच्या या रेड्याने प्रदर्शनाला मोठी रंगत आणली आहे. कमांडोचे वजन, किंमत, आहार, दैनंदिन दिनचर्या याबद्दल ऐकून लोक थक्क होत आहेत. अनेकजण त्याच्यासोबत फोटो काढण्याचा आनंद लुटत आहेत.
कमांडोच्या आहाराची चर्चा
कमांडो नावाचा हा रेडा त्याच्या आहारासाठी खास ओळखला जातो. कमांडो दररोज साधारण 50 किलो हिरवा चारा आणि सुकी कुट्टी खातो. त्याच्या आहारात पोषणमूल्ये अधिक वाढवण्यासाठी रोज 10 किलो सरकी पेंड आणि खोबरे पेंड यांचा समावेश असतो. याशिवाय, त्याला शरीर तंदुरूस्त ठेवण्यासाठी दररोज अर्धा किलो शुद्ध तूप किंवा तेल दिले जाते. यामुळे त्याची त्वचा, आरोग्य आणि वजन व्यवस्थित राहते.
विशेष म्हणजे, कमांडो दररोज 8 ते 10 लिटर दूधही पितो, ज्यामुळे त्याच्या शरीराला अतिरिक्त ऊर्जा आणि ताकद मिळते. हा संतुलित आणि पोषणयुक्त आहार रेड्याच्या 1500 किलो वजनाला टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याला सुदृढ ठेवण्यासाठी दिला जातो. कमांडोचा आहार पाहून प्रदर्शनाला आलेले लोक आश्चर्यचकित होत आहेत. कृषिक 2025 या प्रदर्शनाचे हे खास आकर्षण खऱ्या अर्थाने लोकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.