बारामती, 17 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बारामतीतील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रात कृषिक 2025 या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाचे यंदाचे हे दहावे वर्ष आहे. भारतातील हे सर्वात मोठे कृषी प्रदर्शन आहे. कृषिक प्रदर्शनाचा आजचा (दि.17) दुसरा दिवस आहे. हे कृषिक 2025 प्रदर्शन पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी राज्यभरातून आणि परराज्यातून हजारो शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्रात गर्दी केली होती. यामध्ये शेतकऱ्यांसोबत महिलांची आणि युवापिढीची देखील मोठी उपस्थिती होती.
https://www.facebook.com/share/p/1Db5JxV1Uc/
प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती
भाजपचे आमदार सुरेश धस, कोल्हापूरच्या संयोगिताराजे छत्रपती आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज कृषिक 2025 प्रदर्शनाला भेट दिली. तसेच मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनीही या कृषी प्रदर्शनाला हजेरी लावली. यावेळी एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार आणि विश्वस्त सुनंदा पवार यांनी उपस्थित मान्यवरांना कृषी प्रदर्शनाची माहिती दिली.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि शेती
यंदाच्या कृषिक प्रदर्शनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित ऊसाच्या शेतीने शेतकऱ्यांचे लक्ष वेधले, ज्यामुळे कृषिक 2025 प्रदर्शनात या विभागाला शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली. शेतकऱ्यांनी उसाच्या विविध जातींच्या उत्पादन पद्धती आणि त्यामागील तांत्रिक प्रक्रिया समजून घेतली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या आधुनिक तंत्रज्ञानाचा ऊस शेतीत कसा उपयोग केला जातो? आणि उत्पादन वाढीसाठी हे तंत्र नेमके कसे कार्य करते? याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना मिळाली. या तंत्रज्ञानामुळे शेती अधिक यशस्वी आणि लाभदायक होऊ शकते, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
देशी वाण आणि आधुनिक पद्धती
या कृषिक 2025 प्रदर्शनात जर्मनी आणि जपान मधील कट फ्लॉवर्स पाहण्यासाठी फुलपीक उत्पादकांनी मोठी गर्दी केली. तसेच काळा कांदा, काळा टोमॅटो आणि काळी मिरची यांसारखे देशी वाण पाहण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये रस दिसून आला. सोबतच भोपळ्याच्या विविध जाती आणि त्यांच्या आकारांवर शेतकऱ्यांनी खास लक्ष दिले.
होमिओपॅथी औषधांचे महत्त्व
याशिवाय, शेतकऱ्यांनी कृषिक 2025 प्रदर्शनामध्ये होमिओपॅथी औषधांच्या वापरावर आधारित पिकांवर रासायनिक प्रादुर्भाव न करणाऱ्या औषधांचा उपयोग कसा होतो? याची माहिती घेतली. भविष्यात आपल्याला अन्न उत्पादन करण्यासाठी रसायनांचा वापर कमी करावा लागेल. होमिओपॅथी औषधे ही शेतीसाठी एक चांगली पर्यायी पद्धत आहे. ही औषधे पिकांना रोगांपासून कशी वाचवतात? याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांनी पाहिले. सोबतच यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून कापसाच्या शेतीचे प्रात्यक्षिक काही शेतकऱ्यांनी करून दाखवले.
भव्य पशुप्रदर्शन
शेतीच्या पिकांसोबतच या कृषिक 2025 प्रदर्शनामध्ये पशुप्रदर्शनाचे स्वतंत्र दालन आहे. हे देखील कृषिक प्रदर्शनाचे एक वैशिष्ट्य आहे. या पशुप्रदर्शनात हैदराबादच्या हसन बिन त्रीप यांनी आणलेला 11 कोटींचा सोनेरी मारवाडी घोडा आणि नांदेडच्या मालेगाव तालुक्यातील विश्वनाथ जाधव यांनी आणलेल्या लालकंधारी बैलांच्या जोड्या शेतकऱ्यांसाठी आकर्षण ठरल्या. शेतकरी या सर्व जनावरांना पाहण्यासाठी खूप उत्सुक होते.