बारामती, 16 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बारामतीच्या कृषिक 2025 या प्रदर्शनात एक नवीन तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे, जे विशेषतः शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. ‘माती विना शेती’ या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी मातीच्या वापराशिवाय शेती करू शकतात. ज्याला हायड्रोपोनिक्स किंवा एरोपोनिक्स शेती असेही म्हटले जाते. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पाण्याच्या वर विविध प्रकारच्या पालेभाज्या, फुलांची आणि फळांची पिके घेण्यात आली आहेत. या तंत्रज्ञानाच्या आधारे मातीच्या आवश्यकतेशिवाय पिकांचे उत्पादन घेता येते.
यांसारख्या पिकांचे उत्पादन घेता येते
‘माती विना शेती’ या पद्धतीमध्ये पिकांची मुळे पाण्याच्या आणि पोषणतत्त्वांच्या द्रवामध्ये ठेवलेली असतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी जागेत, कमी पाण्याचा वापर करून अधिक उत्पादन मिळवता येते. माती विना शेती या पद्धतीत अनेक प्रकारच्या पालेभाज्या, फुलांचे पिके, फळांची पिके घेतली जातात. यामध्ये पालक, कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्या, तसेच टोमॅटो, काकडी, मिरची, भोपळा यांसारख्या फळभाज्या, गुलाब, लिली, मोगरा आणि इतर फुले तसेच स्ट्रॉबेरी सारख्या पिकांचे उत्पादन घेतले जाऊ शकते.
कृषिक मध्ये माती विना शेतीचे प्रात्यक्षिक
बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्र येथील ‘कृषिक 2025’ प्रदर्शनात माती विना शेती या उपक्रमाचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना पाहता येणार आहे. या हायड्रोपोनिक्स शेतीमध्ये पिकांना जलद आणि चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी विशेष प्रणालीचा वापर केला जातो. कृषी विज्ञान केंद्रात माती विना शेतीचा प्रयोग करण्यात आला असून यात भाजीपाला तसेच काही फुले आणि फळांची पिके यांची लागवड करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या शेतीचा उपक्रम शेतकऱ्यांना दाखविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात सहभागी होणारे शेतकरी माती विना शेती या तंत्रज्ञानाचे फायदे आणि यासंदर्भातील उपयोगाची माहिती घेऊ शकतील. तसेच शेतकऱ्यांना माती विना शेती विषयी मार्गदर्शन केले जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्याची संधी मिळेल. ‘माती विना शेती’ शेतकऱ्यांसाठी एक नवा मार्ग प्रदान करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषिक प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.