भिगवण, 24 ऑक्टोबर: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील मदनवाडी गावाजवळ ओढ्याच्या पुलाखाली काही दिवसांपूर्वी एका गरोदर महिलेला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पोलीस तपासानुसार, मृत महिलेचा खून तिच्या स्वतःच्या पतीने केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलीसांनी सांगितले की, दिपाली सुदर्शन जाधव (वय 30, रा. कटफळ, ता. बारामती) हिचा विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय तिच्या पती सुदर्शन उर्फ रविराज रणजित जाधव (वय 36) याला होता. त्यावरून आरोपी पतीने रागात डोक्यावर लोखंडी वस्तूने हल्ला करून पत्नीचा खून केला. त्यानंतर आरोपीने मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून दुचाकीवर ठेवला आणि तो मदनवाडी गावाजवळील पुलाखाली फेकून दिला.

हा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना 22 ऑक्टोबर रोजी मिळाली. त्या मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. मात्र, हातावर ‘रविराज’ नावाचा टॅटू असल्यामुळे पोलीसांना मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत आरोपीने खून केले असल्याची कबुली दिली.

तात्पूर्वी, आरोपीने पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार बारामती पोलीस ठाण्यात केली होती. परंतु, पोलीस तपासात त्यानेच आपल्या पत्नीचा खून केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केल्यावर, त्याला 31 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त तपासाखाली पार पाडण्यात आली.

