बारामती, 16 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाची मागणी केली जात आहे. अशातच धनगर समाज देखील आता आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आज बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. बारामतीत या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बारामती शहरातील व्यापारी दुकाने, व्यावसायिक दुकाने आणि बाजारपेठ हे सकाळपासूनच बंद असल्याचे दिसत आहे.
टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक
दरम्यान, बारामतीमध्ये चंद्रकांत वाघमोडे हे धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 9 नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात व्हावा या मागणीसाठी हे उपोषण केले जात आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती सध्या खालावत चालली आहे. धनगर समाजाच्या या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली नसल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर, सकल धनगर समाजाच्या वतीने आज बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. या संदर्भात धनगर समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिवाळीच्या काळात बारामतीतमध्ये होते. तरी देखील त्यांनी उपोषणकर्त्यांची विचारपूसही केली नाही. त्यामुळे अजित पवारांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे धनगर समाजाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर धनगर समाज आक्रमक झाला आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती. यावेळी सुप्रिया सुळे यांनी या आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला होता.
मुख्यमंत्री शिंदेंनी गडचिरोलीतील अतिदुर्गम भागात दिवाळी साजरी केली
धनगर समाजाच्या आजच्या बारामती बंदला व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्यात येतील, असे व्यापारी महासंघाने जाहीर केले होते. त्यामुळे आजच्या बारामती बंद कडे राज्य सरकारचे लक्ष जाणार का? तसेच, बारामती बंदनंतर राज्य सरकार धनगर समाजाला आरक्षण देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
One Comment on “धनगर समाजाच्या वतीने आज बारामती बंदची हाक”