बारामती शहर पोलीस स्टेशनला अवैध गुटखाचा साठा वसंत नगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपाधीक्षक गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, सपोनि पालवे, सपोनि वाघमारे, पो.कॉ. चव्हाण, पो. कॉ. ठोंबरे, पो. कॉ. दळवी, पो.कॉ. कांबळे यांच्या टिमला टी.सी. कॉलेजकडे जाणाऱ्या मिशन हायस्कूलच्या शेजारील रोडवर एका अशोक लेलंड टेम्पो (क्र. एमएच 12 क्यूजी 8872) संशयास्पद थांबलेला आढळला. पोलीस टेम्पो जवळ येत असल्याचे समजताच संतोष गायकवाड व एक अज्ञात व्यक्ती असे दोघेजणांनी मिशन हायस्कूलच्या तार कंपाऊंडवरुन उडी मारून तेथून पळ काढला. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला मात्र अंधाराचा फायदा घेत दोन संशयित तेथून पळून गेले.
पोलिसांनी त्यांचा मोर्चा टेम्पोकडे वळविला असता, त्या टेम्पोमध्ये गुलाम नावाचा गुटख्याच्या पांढऱ्या पिशव्या मिळून आल्या. सदर अवैध साठा आणि लेलंड टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारवाईत तब्बल 13 लाख 8 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यात 11 लाख 8 हजार 800 रुपयांचा गुटखा असून 2 लाख रुपयांचा लेलंड टेम्पो असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदर प्रकरणात संशयित आरोपी संतोष गायकवाड आणि अज्ञाता विरोधात पोलीस नाईक यशवंत पवार यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, बारामती अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, सपोनि. पालवे, सपोनि. वाघमारे, पोलीस नाईक यशवंत पवार, पो.कॉ. चव्हाण, पो.कॉ. ठोंबरे, पो.कॉ. दळवी, पो.कॉ. कांबळे यांनी केली आहे.