बारामती शहर पोलिसांची अवैध अड्ड्यावर धाड

बारामती, 9 मेः बारामती शहरातील दुर्गा टाकी समोरील अनंत अशा नगर येथे बाई माउशी यांचे पत्र्याचे शेड आहे. या शेडच्या बंद खोलीत अवैधरित्या कल्याण व मुंबई मटका जुगार दररोज सर्रासपणे घेतला जातो, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना मिळाली. सदर माहिती त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना सांगितली. पोलीस उपाधीक्षक यांच्याकडून सदर ठिकाणीच्या अवैध मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यासाठीचे वारंट त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुनील मोठे यांच्या नावे दिले.

सदर अवैध मटका अड्ड्यावर आज, सोमवार 9 मे रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल मोठे, पोलीस हवलदार भिमराव आहेर, चालक सहाय्यक पोलीस फौजदार मोघे, पोलीस हवालदार यशवंत पवार, दशरथ इंगोले, पोलीस शिपाई कांबळे, महिला पोलीस नाईक गलांडे यांच्या पथकाने छापा मारला. या छापेमारीत बंद खोलीत मोबाईलवर मटका घेताना मोहन हरिभाऊ चव्हाण, मनोज मोहन चव्हाण, श्रीमती कौशल्या भीमराव जाधव या संशयित आरोपींसह रोख 2 हजार 715 रुपये तसेच काही चिल्लर, 5 हजार रुपये किमतीचा स्मार्ट मोबाइल फोन (ज्यामध्ये बारामती शहरातील मटका एजंटचा एक ग्रुप आहे. त्यावर मटक्याच्या चिठ्ठ्याची सांकेतिक भाषेत माहिती कळवली आहे.), टेबल फॅन तसेच दोन पाण्याचे जार असा एकूण 9 हजार 740 रुपये किमतीचा मटका साहित्य मुद्देमाल मिळाला आहे.

वरील संशयित आरोपींवर मुंबई जुगार कायदा कलम 4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर मोबाईलमधील व्हाट्सअ‍ॅपमध्ये मिळालेल्या ग्रुपवरील सर्व मोबाईल नंबर धारकांना या गुन्ह्यात अटक करण्यात येणार आहे. सदरचा मोबाईल सायबर तज्ञाकडे पाठवून डिलीट झालेले मेसेज सुद्धा काढण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *