बारामती, 21 जुलैः बारामती शहर पोलिसांनी 20 जुलै रोजी शहरातील पानगल्ली येथे सुरु असलेल्या मटका बुकिंग धंद्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत दोन पंटरसह मालकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पानगल्लीतील मन्सूर शेख यांच्या घरासमोर असणाऱ्या टपरीच्या आडोशाला लोकांकडून पैसे घेऊन सांकेतिक भाषेत मटक्याची चिट्ठी पाडून देत होते, अशी माहिती शहर पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरुन शहर पोलिसांनी छापा मारून मटका स्लिप बुक, बॉल पेन, कार्बन तसेच रोख रक्कम 1115 रुपये असा मुद्देमाल जप्त करुन तिघांना अटक केली आहे.
सदर कारवाईत मन्सूर शेख (रा. पानगल्ली, बारामती), लहू गायकवाड (वय 46, रा. उद्धट, ता. इंदापूर), काळूराम जाधव (वय 45, रा. कैकाड गल्ली, बारामती) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींनी नावे आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस फौजदार सोनवलकर, उमासे, पोलीस कर्मचारी शाहू, राणे यांनी केली आहे.