बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबू आणि कांद्याला उच्चांकी भाव

बारामती, 29 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबू आणि कांद्याला उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. त्यानुसार, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुपे उपबाजार येथील लिलावात बुधवारी (दि.28) लिंबाला प्रति किलो 92 रुपये असा उच्चांकी दर मिळाला असून, लिंबास प्रति किलो 65 रुपये इतका किमान दर मिळाला आहे. त्याचवेळी लिलावात लिंबाचा प्रति किलो 80 रुपये असा सरासरी दर निघाला आहे.

कांद्याला ही उच्चांकी दर

तसेच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजार येथील भाजी मार्केट मध्ये कांद्याला देखील उच्चांकी दर मिळाला आहे. जळोची उपबाजार येथील भाजी मार्केटमध्ये बुधवारी (दि.28) कांद्याला प्रति क्विंटल 4600 रुपये असा कमाल दर मिळाला आहे. त्याचवेळी याठिकाणी कांद्याचा प्रति क्विंटल 3450 रुपये असा सरासरी दर निघाला आहे.

आवक कमी मागणी जास्त

दरम्यान, पुणे शहर जवळ असल्याने लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच लिंबू खरेदीसाठी याठिकाणी बाहेरील खरेदीदार देखील येत आहेत. त्यामुळे परपेठेत लिंबू व कांद्याची मागणी जास्त आहे. परंतु, सध्या लिंबू आणि कांद्याची आवक कमी असल्याने उच्चांकी दर निघत आहेत अशी माहिती सभापती सुनिल पवार व उपसभापती निलेश लडकत यांनी दिली.

शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणावा, बाजार समितीचे आवाहन

सुपे उपबाजार येथे दर बुधवारी लिंबाचा लिलाव होत असतो. बारामती तालुक्यासह दौंड, पुरंदर या भागातील शेतकरी याठिकाणी लिंबू विक्रीस घेऊन येत असतात. लिंबू आणि कांद्याला स्थानिक बाजारपेठेत किरकोळ विक्रीसाठी आणि परपेठेत ही मागणी वाढत असल्याने आणखी दर वाढतील असे अपेक्षित आहे. परंतु, चांगल्या मालास उच्च दर मिळत असल्याने लिंबू आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल ग्रेडींग व सॉर्टींग करून आणावा म्हणजे आणखी जादा दर मिळतील. समितीचे बाजार आवारात शेतमालाचे अचूक माप, लिलावापूर्वी गोणीचे वजन व त्याच दिवशी पट्टी तसेच उघड लिलाव पद्धतीने विक्री व समितीचे नियंत्रण यामुळेच शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होत आहे, अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल बारामती बाजार समितीचे आवारात विक्रीस आणावा असे आवाहन समिती तर्फे करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *