बारामती, 16 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बारामतीतील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राने नेदरलँडच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकाच झाडाला टोमॅटो आणि वांगी या पिकांचे उत्पादन घेण्यात यश मिळवले आहे. या प्रयोगामध्ये द्विपीक पद्धतीचा उपयोग करण्यात आला आहे, ज्याला कलमी शेती असेही म्हणतात. बारामती येथे 16 ते 20 जानेवारी दरम्यान आयोजित कृषिक प्रदर्शनात शेतकऱ्यांना या द्विपीक तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके पाहण्याची संधी मिळणार आहे. या प्रदर्शनात एका झाडाच्या खोडावर एका बाजूला वांगी आणि दुसऱ्या बाजूला टोमॅटो दिसणार आहेत.
या शेती पद्धतीमुळे शेतकऱ्यांना बाजारभावातील चढ-उतारामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून दिलासा मिळण्यास मदत होते. कारण, एका पिकामुळे आर्थिक नुकसान झाले, तरीही दुसऱ्या पिकापासून नफा मिळण्याची संधी असते. दरम्यान, एकाच पाण्यात दोन पिके पिकवण्याची क्षमता असलेल्या या तंत्रज्ञानामुळे पाण्याची मोठी बचत होते. बारामती कृषी विज्ञान केंद्रातील या प्रयोगाच्या उत्पादनासाठी कमी पाणी, कमी खत आणि कमी खर्च लागतो. तसेच या द्विपीक तंत्रज्ञानामुळे पिकांवर होणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. अशा पिकांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता अधिक असते. तसेच मातीमधून होणाऱ्या रोगांचा धोका कमी होतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो.
कृषिक मध्ये कलमी शेतीचे प्रात्यक्षिक
बारामती येथे 16 ते 20 जानेवारी दरम्यान आयोजित कृषिक प्रदर्शनात शेतकऱ्यांना या द्विपीक तंत्रज्ञानान दाखवले जाणार आहे. या प्रदर्शनात एका झाडाला टोमॅटो आणि वांगी पिके घेण्यात आल्याचा यशस्वी प्रयोग शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय, शेतकऱ्यांना कलमी पद्धतीने लागवड केलेल्या शिमला मिरची, टोमॅटो, मिरची, कलिंगड, टरबूज यांसारख्या पिकांची माहिती आणि प्रात्यक्षिके तज्ञांकडून मिळतील. ही पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याने त्यांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी. या अभिनव तंत्रज्ञानामुळे उत्पादनवाढी सोबतच शेती अधिक टिकाऊ आणि नफेखोर होण्यास मदत होणार आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राचा हा प्रयत्न शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.