नागपूर, 11 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कलम 370 संदर्भात सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. “ज्या प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे, हा भारताचा विजय आहे. सुप्रीम कोर्टाने कलम 370 रद्द करण्यासंदर्भातील केंद्र सरकारचा निर्णय कायम ठेवल्याने जम्मू काश्मीर मधील लोकांचा विजय झाला. खऱ्या अर्थाने आज एकसंघ भारत प्रस्तापित झाला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे मी आभार मानतो,” अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1734164304424026127?s=19
त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वर्षे 370 कलम हटवले पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यांची मागणी पूर्ण करण्याचे काम माननीय मोदीजींनी केलं. पण ज्यावेळी मोदीजी हे काम करीत होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका राज्यसभेत वेगळी लोकसभेत वेगळी तसेच अनेक ठिकाणी त्यांची वेगळी भूमिका होती. उद्धव ठाकरेंनी जे बाळासाहेबांच्या भूमिकेला विरोध करीत होते त्यांना साथ दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना या संदर्भात काहीही बोलण्याचा अधिकार नाही.” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
तत्पूर्वी, “नवाब मालिकांना एक न्याय लावणार असाल, तर तोच न्याय प्रफुल्ल पटेलांना लावणार का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यांच्या या प्रश्नांला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर दिले आहे. “नवाब मलिकांवर आरोप आणि त्यांच्यासारखं जेल किंवा तशी परिस्थिती कुणाचीही असेल, तर त्याच्यावरही तोच न्याय लागला पाहिजे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
याबरोबरच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले होते. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सहभागी झाले होते. यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर हल्लाबोल केला होता. तसेच “केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा,” अशी मागणी केली होती. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयाची आठवण करून दिली. “माननीय पवार साहेब हे दोन वेळा केंद्रीय कृषिमंत्री होते, त्यावेळी त्यांनी देखील दोन वेळा कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.