पुणे, 22 मे: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणातील 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीचा जामीन बाल हक्क न्यायालयाने रद्द केला आहे. त्याचबरोबर या अल्पवयीन आरोपीला 5 जूनपर्यंत बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश बाल हक्क न्यायालयाने दिले आहेत. याआधी पोलिसांनी या आरोपीच्या बिल्डर वडिलांना अटक केली होती. कोर्टाने आज त्याच्या वडिलांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पुण्यातील कल्याणी नगर परिसरात 19 मे रोजी पोर्श कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आता बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
https://twitter.com/ANI/status/1793296743813276146?s=19
प्रौढ ठरविण्याचा निर्णय राखून ठेवला
याच्या आधी कोर्टाने हा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन दिला होता. मात्र बाल हक्क न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज आज रद्द केला आहे. दरम्यान, या आरोपीच्या विरोधात खटला चालवताना त्याला प्रौढ ठरविण्यात यावे, यासाठी पुणे पोलिसांनी आणखी एक याचिका कोर्टात दाखल केली होती. मात्र, कोर्टाने या याचिकेवर आज निकाल देण्यास नकार दिला. या प्रकरणाच्या पोलीस तपासानंतर संबंधित आरोपीला प्रौढ ठरवायचे की नाही? यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल, असे बाल हक्क न्यायालयाने म्हटले आहे.
https://twitter.com/AHindinews/status/1793305964252401977?s=19
पोलीस आयुक्त काय म्हणाले?
कोर्टाच्या या निकालानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही बाल हक्क न्यायालयासमोर या आरोपीच्या विरोधात प्रौढ म्हणून खटला चालवण्यास आणि त्याला बाल सुधारगृहात पाठवण्याची परवानगी मागितली होती. कोर्टाच्या आदेशाने या अल्पवयीन आरोपीला 5 जूनपर्यंत 15 दिवसांसाठी बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. आता त्याच्या विरोधात प्रौढ म्हणून खटला चालवण्याच्या कोर्टाच्या आदेशाची आम्हाला प्रतीक्षा आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे.