बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण; आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

बदलापूर, 26 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला कल्याण न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बदलापूरमधील एका शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात पोलिसांनी या शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याला अटक केली होती. अक्षय शिंदे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याची पोलीस कोठडी समाप्त झाली होती. त्यामुळे त्याला आज (सोमवारी) कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

https://x.com/ANI/status/1827950024078086289?s=19

घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट

दरम्यान, बदलापूर येथील एका शाळेतील साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर या मुलींच्या पालकांनी सोमवारी (दि.19) रात्री आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदे याला अटक केली. परंतु त्याआधी पोलिसांनी या याप्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी बरेच तास टाळाटाळ केली. त्यामुळे या घटनेवरून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. यावेळी नागरिकांनी 20 ऑगस्ट रोजी बदलापूर रेल्वे स्थानकावर तब्बल 10 तासांहून अधिक वेळ रेल्वे रोको आंदोलन केले. त्यावेळी आंदोलकांकडून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

पोलिसांवर निलंबनाची कारवाई

बदलापूरच्या घटनेत गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबित करण्याची कारवाई केली. तसेच त्यांनी यावेळी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी समिती स्थापन केली. सध्या या प्रकरणाचा तपास एसआयटी समिती करीत आहे. तसेच या प्रकरणातील दोषीवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सोबतच हे प्रकरण बदलापूरच्या ज्या शाळेत घडले त्या शाळेवरही कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *