बदलापूर, 23 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बदलापूर येथील एका शाळेतील निष्पाप मुलींचे लैंगिक शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे हा पोलीस एन्काऊंटर मध्ये मारला गेला आहे. अक्षय शिंदे याने पोलिसांच्या गाडीतून रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिसांवर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी (दि.23) पोलीस अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात होते, त्यावेळी ही घटना घडली. या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.
https://x.com/ANI/status/1838239591817715929?s=19
https://x.com/ANI/status/1838217097975083393?s=19
अशी घडली घटना
ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना अक्षय शिंदे याने पोलिसांच्या गाडीतून बंदूक हिसकावून घेतली आणि त्यानंतर त्याने पोलिसांवर काही राऊंड गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी देखील स्वतःच्या रक्षणासाठी प्रत्युत्तरात गोळीबार केला, यामध्ये अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
16 ऑगस्ट रोजी प्रकरण उघडकीस
तत्पूर्वी, बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अक्षय शिंदेला अटक केली होती. शाळेच्या बाथरूममध्ये दोन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण 16 ऑगस्ट रोजी उघडकीस आले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी बरेच तास रेल्वे रोको आंदोलन केले होते. यानंतर पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक केली. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी पथकाची स्थापना केली होती. तेंव्हापासून या प्रकरणाचा तपास एसआयटीचे पथक करीत होते. तर आता या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर मध्ये मारला गेला आहे. दरम्यान, त्याच्या या एन्काऊंटरच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.