बारामती, 6 जुलैः बारामती शहरात मोठ्या दिमाख्यात कोट्यावधी रुपये खर्चून बारामती उपविभागाची प्रशासकीय बहुमजली इमारत उभारण्यात आली. या बहुमजली इमारतीत विविध प्रशासकीय विभागाची कार्यालये आहेत. त्यामुळे या प्रशासकीय इमारतीत दररोज हजारो नागरीक शहरासह तालुक्यातून वेगवेगळ्या कामानिमित्त येत असतात. मात्र या प्रशासकीय इमारतीचे काही वर्षातच दुरावस्था झाल्याचे चित्र आहे. सदर प्रकाराकडे संबंधित प्रशासनानेही कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.
प्रशासकीय भवनाच्या दुसऱ्या मजल्यावर वरंड्याकडे जाण्यासाठी काचेची भिंत बसवण्यात आली आहे. हेतू हाच की इमारतीच्या सौदर्यात भर पडावी तसेच काही प्रमाणात आसपासचा परिसराचे सौंदर्य नागरिकांना दिसावे, हा या मागचा हेतू असावा. मात्र काही वर्षांपासून या काचेच्या भिंतींना बसविलेले दारवाजे गायब झाले तर काहींचे दारवाजे तिथेच असून धोकादायक पद्धतीने अलगतपणे ठेकवून ठेवण्यात आले आहे. या प्रकारामुळे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच याकडे प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. एखादी दुर्घटना झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का? असा सवालही यानिमित्ताने प्रस्तृत होत आहे.
यासह या भव्य इमारतीत अजूनही लिफ्ट बंद अवस्थेत असून कामानिमित्त येणारे दिव्यांग, वयस्कर आणि आजारी नागरीकांना विविध कार्यालयात येण्यासाठी जिन्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असल्याचे चित्र आहे.