मुंबई, 06 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागामार्फत आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील इंदू मिल परिसरात जगाला हेवा वाटेल अशा प्रकारचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
“मी सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांचे लाखो अनुयायी आज त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले आहेत. या सर्वांनाच माझा आदरपूर्वक जय भीम. चैत्यभूमीवर या दिवशी माथा टेकवणे म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रित असलेल्या जीवनमूल्यांचा जागर करणे होय. बाबासाहेबांनी दिलेल्या सशक्त आणि भक्कम अशा भारतीय संविधानाच्या आधारावर आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे.” असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
#चैत्यभूमी | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 6, 2023
https://t.co/21wXsGrdjw
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर भारताला कायदे तर दिलेच पण त्यांनी अर्थव्यवस्था, शेती, सिंचन, ऊर्जा, शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रात धोरणांची आखणी करून दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या धोरणाला त्यांनी मानवतेची जोड दिली. त्यामुळेच भारतात एकता, बंधुता आणि एकात्मता या तत्त्वांना बळ आणि ताकद मिळली. बाबासाहेबांच्या प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या ग्रंथात त्यांनी भारतीय रुपयाच्या उत्कांतीची चिकित्सा केली आहे. तसेच भारतासाठी आदर्श चलन पद्धती कोणती हे देखील या ग्रंथात सांगितले आहे.” असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
रविंद्र सोनवणे यांच्या पुढाकाराने हॉलीबॉलचे मैदान सुरु
“अलिकडेच आपण 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यात केवळ उत्सवप्रियता नव्हती तर त्यात संविधानाचे महत्त्व होते. या संविधान दिनी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला, ही आपल्यासाठी एक ऐतिहासिक घटना होती. वकिलाच्या पेहरावातील बाबासाहेबांचा हा पुतळा सर्वोच्च न्यायालयातील सर्व वकिलांनी एकत्र येऊन उभा केला. हे देखील विशेष आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी यावेळी सर्व समाजघटकांना न्याय प्रक्रियेमध्ये योग्य स्थान मिळावे अशी इच्छा व्यक्त केली होती. ही महत्त्वाची गोष्ट आहे.” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
“आपले सरकार देखील त्या दृष्टीने पाऊल उचलत आहे. बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा वापर तळागाळातील लोकांना दुर्बलांना सशक्त करण्यासाठी केला. डॉ बाबासाहेब यांचे विचार जागृत ठेवण्याची आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आपली जबाबदारी आहे. बाबासाहेबांनी घटना समितीमधील त्यांच्या पहिल्याच भाषणामध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्राची उभारणी यासंदर्भात अतिशय मोलाचे विचार मांडले. सत्ता हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे. असे बाबासाहेबांनी म्हटले आहे. याच तत्त्वावर आपले सरकार चालत आहे.” असे ही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
आठ वर्षांच्या लढ्यास अखेर यश!
“सत्तेचा वापर परिवर्तनासाठी लोकांच्या भल्यासाठी, सर्वांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवण्यासाठी, सर्वांना सुखाचे, समाधानाचे, समृद्धीचे दिवस आणण्यासाठी आपण काम करतोय. व्यक्तीगत प्रतिष्ठा जपण्याऐवजी संविधनिक मूल्यांची आपण प्रतिष्ठा जपली पाहिजे. म्हणूनच मुंबईत इंदू मिल याठिकाणी होणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक सरकारसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करू, असा विश्वास मी तुम्हाला देतो. त्यामुळेच इंदू मिल परिसरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामाला वेग आलेला आहे. हे भव्य स्मारक आणि येथील ग्रंथालय, संदर्भ, बाबासाहेबांच्या विषयीची माहिती, साहित्य संदर्भ, सुविधा या गोष्टी देखील जगभरातील अनुयायींना प्रेरित करतील. तसेच जगाला हेवा वाटेल अशा प्रकारचे बाबासाहेबांचे हे स्मारक उभे राहील, असा विश्वास मी व्यक्त करतो,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत.
One Comment on “जगाला हेवा वाटेल असे बाबासाहेबांचे स्मारक उभारणार – मुख्यमंत्री शिंदे”