बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार, अजित पवारांची माहिती

मुंबई, 13 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी (दि.12) रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज (दि.13) मुंबईतील कूपर रुग्णालयात जाऊन सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांनी बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. या प्रकरणाचा छडा लवकरच लागेल. बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर आज रात्री शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे अजित पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

https://x.com/ANI/status/1845340898491584616?t=S-1392q5YbgZ4aWH_oUSQA&s=19

https://x.com/ANI/status/1845340024654659618?t=fd8zaCfLEEJzBXlu-l71eg&s=19

अजित पवार काय म्हणाले?

बाबा सिद्दीकी यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. ही घटना घडली आहे यावर विश्वास बसत नाही. पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने चौकशी करण्याचे काम करीत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. तर एक आरोपी फरार झाला आहे. या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चार ते पाच पथके तयार केली आहेत. ही पथके वेगवेगळ्या राज्यांत रवाना झाली आहेत. तसेच या तपासाबाबतचे आदेश मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मी स्वतः पोलिसांना दिले आहेत. असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांचा सखोल तपास सुरू आहे. अशा प्रकारच्या घटनांवर राजकारण करणे दुर्देवी आहे. तसेच यावर निर्णयाप्रत प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

येथे होणार अंत्यसंस्कार

बाबा सिद्दीकी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मुंबईतील कूपर रुग्णालयात करण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतर बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे. येथे दोन ते तीन तास त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आज रात्री बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर मुंबईतील मरीन लाईन्स येथील बडा कबरीस्तान या ठिकाणी शासकीय इतमामात दफनविधी करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *