मुंबई, 30 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 26 आरोपींना अटक केली आहे. तर 3 आरोपी अजून फरार असून, त्यांचा सध्या पोलीस शोध घेत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी आज (दि.30) दिली आहे. शुभम लोणकर, निशान अख्तर आणि अनमोल बिश्नोई अशी फरार आरोपींची नावे आहेत.
https://x.com/ANI/status/1862775694037848528?t=0wnz0qgxXr2cSwtUSB_ODA&s=19
26 आरोपींना अटक
बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईतील वांद्रे पूर्व येथील त्यांचा मुलगा आमदार जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हल्ल्यानंतर बाबा सिद्दीकी यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्यांच्या हत्येनंतर लगेचच मुंबई पोलिसांनी गुरनैल सिंग आणि धरमराज कश्यप या दोन शूटर्सना घटनास्थळावरून अटक केली होती. तसेच या घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी प्रवीण लोणकर आणि हरीश निषाद या आरोपांना अटक केली होती. तेंव्हापासून आतापर्यंत याप्रकरणात एकूण 26 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. हे सर्व आरोपी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि पंजाब राज्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सध्या मुंबई पोलीस करीत आहेत.
मकोका कायदा काय आहे?
मुंबई पोलिसांकडून या सर्व आरोपींवर आता मकोका लावण्यात आला आहे. मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे आता या आरोपींना जामीन मिळणे कठीण झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने 1999 मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू केला होता. संघटित आणि अंडरवर्ल्ड गुन्हेगारी नष्ट करणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. अंडरवर्ल्डशी संबंधित गुन्हेगारी, अपहरण, हत्या किंवा हत्येचा प्रयत्न, खंडणी, धमक्या, खंडणी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींवर हा कायदा लागू होतो.