मुंबई, 13 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात सध्या नवनवीन माहिती समोर येत आहे. या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम मुंबई पोलिसांनी सांगितला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बाबा सिद्दीकी यांना देण्यात आलेल्या सुरक्षेबाबत मोठा खुलासा केला आहे. या गोळीबाराच्या वेळी बाबा सिद्दीकी यांना कोणत्याही दर्जाची सुरक्षा नव्हती, असे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी 3 पोलिसांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
https://x.com/AHindinews/status/1845437956561232316?t=j7WBqo53-_zqPHIMSmKcUQ&s=19
https://x.com/AHindinews/status/1845438672872866226?t=BzRsUo4KZ1E6ey7joGHJiA&s=19
पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास बाबा सिद्दीकी यांच्यावर त्यांच्या मुलाच्या कार्यालयाबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर दोन आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. या आरोपींकडून दोन पिस्तूल आणि 28 राऊंड जप्त करण्यात आले. तत्पूर्वी, हा गोळीबार करण्याआधी आरोपींनी मिरचीचा स्प्रे आणला होता. सुरूवातीला हे आरोपी या स्प्रेची फवारणी करून नंतर गोळीबार करणार होते. मात्र, तिसरा आरोपी शिवकुमार गौतम याने त्यावेळी थेट गोळीबार सुरू केला. या घटनेवेळी बाबा सिद्दीकी यांच्यासोबत तीन हवालदार होते, परंतु ते यावेळी काही करू शकले नाहीत. या गोळीबारात आणखी एक जण जखमी झाला आहे, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सर्व बाजूंनी तपास सुरू: मुंबई पोलीस
या प्रकरणातील एका आरोपीला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तर दुसऱ्या आरोपीला वैद्यकीय चाचणी केल्यानंतर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रकरणातील अन्य दोन आरोपी सध्या फरार झाले आहेत. या दोन्ही आरोपींची ओळख पटलेली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची 15 पथके बाहेरच्या राज्यांत गेली आहेत. आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत. तसेच लॉरेन्स बिश्नोईच्या कोनातून आम्ही तपास करत आहोत, असे मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी यावेळी सांगितले आहे.