मुंबई, 25 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील हे उद्या मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहेत. मात्र, त्यांना आझाद मैदानावर उपोषण करण्यास आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यासंदर्भात आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आज नोटीस बजावली आहे. सोबतच पोलिसांनी जरांगे पाटील यांना आंदोलन करण्यासाठी नवी मुंबईतील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क हे मैदान सुचवले आहे.
वाहतूक व्यवस्था कोलमडून जाईल: पोलीस
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबई येथे विविध वित्तीय संस्था, आंतरराष्ट्रीय वकालती व इतर वित्तीय केंद्रे कार्यरत असून मुंबईत अंदाजे दररोज 60 ते 65 लाख नागरिक हे नोकरी निमित्ताने ट्रेन व इतर वाहतूकीच्या माध्यमाने प्रवास करीत असतात. सकल मराठा समाज आंदोलक हे प्रचंड मोठ्या वाहन संख्येसह मुंबईत आल्यास त्याचा विपरीत परिणाम होवून मुंबईची दैनंदिन वाहतुक व्यवस्था कोलमडणार असल्याचे आझाद मैदान पोलिसांनी यामध्ये म्हटले आहे.
आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी नाही: आझाद मैदान पोलीस
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदानाचे 7 हजार स्क्वेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेले असून, त्याची क्षमता 5 ते 6 हजार आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे, परंतु तेथे प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानावर पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही. सोबतच त्याप्रमाणात सोयी सुविधा देखील तेथे नाहीत. तसेच उर्वरित मैदान क्रीडा विभागाच्या अख्यत्यारित असल्यामुळे तेथे आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली नाही, असे आझाद मैदान पोलिसांनी या नोटीसमध्ये म्हटले आहे.
हे मैदान आंदोलनासाठी योग्य राहील: आझाद मैदान पोलीस
तसेच 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन असल्याने शिवाजी पार्क मैदानावर ध्वजारोहण व संचलनाचा शासकीय कार्यक्रम पूर्व नियोजित असून आपल्या आंदोलनामुळे सदर कार्यक्रमास अडथळा होण्याची शक्यता आहे. तसेच एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने येणाऱ्या आंदोलकांना सामावून घेण्याची क्षमता शिवाजी पार्क मैदानाची नाही. त्यामुळे आपणास शांततामय मार्गाने आंदोलन करण्यासाठी इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान, सेंटर पार्क जवळ, सेक्टर 29, खारघर, नवी मुंबई हेच मैदान संयुक्तिक राहील. तरी सदर ठिकाणी आंदोलन करण्याकरिता आपण संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करुन रितसर परवानगी घ्यावी, असे आवाहन आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे पाटलांना केले आहे. तसेच या आदेशाचे पालन केले नाही, तर सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांची अवमानना होईल, असेही पोलिसांनी यामध्ये म्हटले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील या विषयी कोणती भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.