धरमशाळा, 28 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज (दि.28) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 5 धावांनी पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाचा हा या स्पर्धेतील चौथा विजय आहे. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर न्यूझीलंडचा या स्पर्धेतील हा दुसरा पराभव आहे. आजच्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 388 धावा केल्या. तर प्रत्युत्तरात मात्र न्यूझीलंडला केवळ 383 धावा करता आल्या. त्यावेळी न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रची शतकी खेळी व्यर्थ ठरली.
तत्पूर्वी, आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अप्रतिम फलंदाजी करताना 49.2 षटकांत सर्वबाद 388 धावा केल्या. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर यांनी त्यांच्या संघाला वेगवान सुरुवात करून दिली. यामध्ये ट्रॅव्हिस हेड याने विश्वचषकातील पहिला सामना खेळताना अवघ्या 59 चेंडूत शतक झळकावले. त्याचबरोबर त्याने 67 चेंडूत 109 धावा केल्या. तसेच डेव्हिड वॉर्नरने ही त्याला उत्तम साथ देत 65 चेंडूत 81 धावांची खेळी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 175 धावांची वेगवान भागीदारी केली. त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या मिचेल मार्शने 36 धावा केल्या. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 24 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 41 धावांची तुफानी खेळी केली. त्याचवेळी जोश इंग्लिशने 28 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 38 धावा केल्या. तसेच नंतर आलेल्या पॅट कमिन्सने देखील 14 चेंडूंत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 37 धावांची खेळी केली.
एका कुटुंबातील 7 जणांची सामूहिक आत्महत्या
फलंदाजांच्या या कामगिरीमुळेच ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडसमोर 389 धावांचे आव्हान ठेवता आले. या सामन्यात न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट आणि ग्लेन फिलिप्सने प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरने 2 आणि हेन्री आणि नीशम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडची पहिली विकेट 61 धावांवर पडली. यावेळी त्यांचा सलामीवीर डेव्हन कॉनवे 17 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. त्यानंतर संघाची 72 धावसंख्या असताना विल यंग 32 धावांवर बाद झाला. मग रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांनी न्यूझीलंडच्या डावाची धुरा सांभाळली आहे. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. त्यानंतर डॅरिल मिशेल 51 चेंडूत 54 धावा करून बाद झाला. त्याचवेळी कर्णधार लॅथम आणि रचिन रवींद्र या दोघांनी शानदार भागीदारी रचत संघाची धावसंख्या 200 पार नेली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. त्यानंतर टॉम लॅथम 22 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. त्यावेळी रचिन रवींद्रने 77 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर तो देखील 89 चेंडूत 116 धावा करून बाद झाला. त्यावेळी ऑस्ट्रेलिया हा सामना सहजपणे जिंकेल, असे वाटत होते.
शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर!
मात्र त्याचवेळी जेम्स नीशम याने 39 चेंडूत 58 धावा करून विजयासाठी प्रयत्न केले. मात्र, शेवटच्या षटकातील 5 व्या चेंडूवर 2 धावा काढण्याच्या नादात तो धावबाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हा सामना 5 धावांनी जिंकता आला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या ॲडम झम्पाने 3 विकेट घेतल्या. तसेच जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आणि ग्लेन मॅक्सवेलने 1 विकेट घेतली. तर ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.
One Comment on “ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर 5 धावांनी थरारक विजय”