ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त

सिडनी, 06 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. डेव्हिड वॉर्नरने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. दरम्यान वॉर्नरने ही मालिका सुरू होण्यापूर्वीच निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली होती.

https://twitter.com/ICC/status/1743550694320218618?s=19

पाकिस्तानकडून गार्ड ऑफ ऑनर!

तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने ही मालिका 3-0 ने जिंकली आहे. तत्पूर्वी, डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा संपूर्ण पाकिस्तान संघाने त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला. यावेळी पाकिस्तानच्या खेळाडूंनी त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. दुसऱ्या डावात वॉर्नरने 57 धावा केल्या. त्याचे कसोटी सामन्यातील हे 37 वे अर्धशतक ठरले आहे.

https://twitter.com/ICC/status/1743590504556613877?s=19

https://twitter.com/ICC/status/1743580953748840870?s=19 

अखेरच्या सामन्याला पत्नी, मुली उपस्थित 

या सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने डेव्हिड वॉर्नरला कसोटी संघातील सर्व खेळाडूंच्या स्वाक्षरी केलेली जर्सी भेट म्हणून दिली. वार्नरच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना पाहण्यासाठी त्याची पत्नी आणि त्याच्या तीन मुली सिडनी क्रिकेट मैदानावर उपस्थित होत्या. दरम्यान, डेव्हिड वॉर्नर हा त्याच्या स्फोटक खेळीमुळे ओळखला जातो. डेव्हिड वॉर्नरने 112 कसोटी सामन्यांमध्ये 44.82 च्या सरासरीने एकूण 8,786 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 26 शतके आणि 37 अर्धशतके झळकावली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *