भारताला हरवून ऑस्ट्रेलिया बनला सहाव्यांदा विश्वविजेता!

अहमदाबाद, 19 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया समोर 241 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य 43 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. तर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला आहे. यापूर्वी 2003 च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. तर आजच्या पराभवामुळे भारताचे तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. या विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग 10 सामन्यांत विजय मिळवला होता. मात्र त्यांना अंतिम फेरीत विजय मिळवता आला नाही.

https://twitter.com/cricketworldcup/status/1726267410053832824?s=19

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी 241 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाची अडखळत सुरूवात झाली. तेंव्हा ऑस्ट्रेलियाचे 3 फलंदाज 47 धावसंख्या असताना बाद झाले. त्यावेळी डेव्हिड वॉर्नर 7, मिशेल मार्श 15 आणि स्टिव्हन स्मिथ 4 धावा करून बाद झाले. तेंव्हा ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत आला होता. मात्र त्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्नश लाबुशेन या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 192 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.

या अंतिम सामन्यात ट्रॅव्हिस हेड याने दमदार शतक झळकावले. त्याने 120 चेंडूत 137 धावांची खेळी केली. यात त्याने 15 चौकार आणि 4 षटकार लगावले. त्याला मार्नश लाबुशेनने चांगली साथ दिली. त्याने 110 चेंडूत नाबाद 58 धावा केल्या. या दोघांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा विश्वचषक जिंकता आला. तर दुसरीकडे मात्र करोडो भारतीयांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यांचे तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंग झाले आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांना चमकदार कामगिरी करण्यात अपयश आले. भारताकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

तत्पूर्वी या सामन्यात भारतासाठी केएल राहुलने सर्वाधिक 66 धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने 54 आणि कर्णधार रोहित शर्माने 47 धावा केल्या. तर या व्यतिरिक्त भारताच्या 6 फलंदाजांना दुहेरी धावसंख्या देखील करता आली नाही. त्यामुळे भारताचा डाव 240 धावांतच संपुष्टात आला. दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने शानदार शतकी खेळी केली. या कामगिरीबद्दल त्याला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

One Comment on “भारताला हरवून ऑस्ट्रेलिया बनला सहाव्यांदा विश्वविजेता!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *