गुवाहाटी, 28 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज खेळला गेला आहे. गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 5 विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर 223 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांच्या मालिकेतील त्यांचे आव्हान जिवंत ठेवले आहे. सध्या या मालिकेत भारतीय संघ 2-1 असा आघाडीवर आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने शतकी खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे ग्लेन मॅक्सवेल या सामन्याचा मानकरी ठरला आहे. तर दुसरीकडे मात्र भारताच्या ऋतुराज गायकवाडचे शतक व्यर्थ ठरले आहे. तर या मालिकेतील चौथा सामना 1 डिसेंबर रोजी रायपूर येथे होणार आहे.
बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना सुखरूप बाहेर काढले
या सामन्यात 223 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 18 चेंडूत 35 धावा केल्या. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 48 चेंडूत नाबाद 104 धावांची खेळी केली. मॅक्सवेलचे आंतरराष्ट्रीय टी-20 मधील हे चौथे शतक आहे. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलशिवाय ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेडने 16 चेंडूत नाबाद 28 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यावेळी ग्लेन मॅक्सवेल आणि मॅथ्यू वेड या दोघांनी नाबाद 91 धावांची भागीदारी केली. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने अखेरच्या चेंडूवर चौकार मारत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. तर या सामन्यात भारताकडून रवी बिश्नोईने 2, तर आवेश खान आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. तर भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा या सामन्यात महागडा ठरला आहे. त्याने त्याच्या 4 षटकांत 68 धावा दिल्या आहेत.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते माहिती पत्रक आणि पोस्टरचे अनावरण
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 बाद 222 धावा केल्या. यामध्ये भारताच्या ऋतुराज गायकवाडने शतकी खेळी केली. त्यामुळे ऋतुराज हा भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात शतक झळकावणारा आठवा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने 57 चेंडूत 123 धावा केल्या. ऋतुराजने त्याच्या या खेळीत 13 चौकार आणि 7 षटकार लगावले. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सामन्यात शतक झळकावणारा ऋतुराज पहिला भारतीय ठरला आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाडने तिलक वर्मासोबत चौथ्या विकेटसाठी 59 चेंडूत 141 धावांची नाबाद भागीदारी केली. तिलक वर्माने या सामन्यात 24 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. याशिवाय भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने 29 चेंडूत 39 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ॲरॉन हार्डी आणि जेसन बेहरेनडॉर्फ आणि केन रिचर्डसन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
One Comment on “अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा भारतावर 5 गडी राखून विजय”