मुंबई, 05 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबवर केलेल्या वक्तव्यावरून त्यांना विधिमंडळ सभागृहाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज (दि.05) अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव केला मंजूर केला आहे. या संदर्भातील प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत मांडला होता. त्यानुसार, समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांचे सदस्यत्व अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत रद्द करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
https://x.com/ANI/status/1897183374667866174?t=BOQMpr9sMLYBPuSoSuRI6A&s=19
अबू आझमी काय म्हणाले होते?
दरम्यान, या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अबू आझमी यांनी औरंगजेबवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. “औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता. त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे.” असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी दोन्ही सभागृहात गदारोळ घातला. तसेच त्यांनी घोषणाबाजी करत अबू आझमी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या गोंधळामुळे विधिमंडळाचे कामकाज तहकूब करावे लागले होते. त्यानंतर आज अखेर अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, उपमुख्यमंत्री शिंदे यांची मागणी
तत्पूर्वी, त्यांच्या या वक्तव्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (दि.04) विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा आमदार अबू आजमी यांचा आम्ही निषेध करत आहोत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले होते.
https://x.com/abuasimazmi/status/1896840212346712428?t=O1En7w90uZX0AoTpAA7vzA&s=19
अबू आझमींची वक्तव्यावरून माघार
त्यानंतर अबू आझमी यांनी ट्विट करत त्यांच्या या वक्तव्यावरून माघार घेतली. माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला आहे. “औरंगजेबाबद्दल जे इतिहासकार आणि लेखक म्हणतात तेच मी बोललो आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा इतर कोणत्याही महापुरूषाबद्दल अपमानास्पद टिप्पणी केलेली नाही. पण माझ्या बोलण्याने कोणी दुखावले असेल तर मी माझे शब्द, माझे विधान मागे घेतो,” असे अबू आझमी यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणाचा राजकीय मुद्दा बनवला जात आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तहकूब करणे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचे नुकसान आहे असे मला वाटते, असेही ते यामध्ये म्हणाले आहेत.