बारामती, 17 जून: (अभिजित कांबळे) बारामती नगरपरिषदेच्या मालकीच्या विविध ठिकाणांवरील 32 गाळ्यांचा ऑनलाईन लिलाव www.eauction.gov.in या संकेतस्थळावर घेण्यात येणार आहे. सदर लिलाव सार्वजनिकपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून, इच्छुक अर्जदारांनी संबंधित गाळ्यांची माहिती व निलाव प्रक्रियेचे सर्व तपशील वरील संकेतस्थळावर पाहावेत, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
गाळ्यांचे स्थान
यासाठी गाळ्यांची यादी, माप, आरक्षित किंमत, वार्षिक भाडे, आणि इतर अटींसह सविस्तर माहिती नगर परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. बारामती शहरातील निरा डावा कालवा हद्दीतील 8 ठिकाणच्या 32 गाळ्यांच्या यात समावेश आहे. तर या निलावात गांधी चौक, सुभाषनगर रोड, श्रीराम मंदिर समोर, रेल्वे स्टेशन रोड, जयंतीलाल चौक, उपनगर परिसर आणि विविध रहिवासी वसाहतीतील गाळ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
आरक्षित किंमतीची माहिती
प्रत्येक गाळ्याचे क्षेत्रफळ सुमारे 7.43 चौ.मी. ते 21.92 चौ.मी. दरम्यान असून, संबंधित गाळ्यांसाठी ना परतावा आरक्षित किंमत 1 लाख रुपये तेती 4 लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. तर गाळ्यांचे दरमहा भाडे सुमारे 2 हजार 700 रुपये ते 11 हजार 100 रुपयांपर्यंत असून, सर्व गाळ्यांसाठी वाढविण्याची लिलाव बोली रक्कम किमान 5 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर हे भाडे आणि किंमत गाळ्यांच्या क्षेत्रफळानुसार वेगवेगळी असणार आहे, असे नगरपरिषदेने सांगितले आहे.
सदर निलावासंबंधी सविस्तर माहिती बारामती नगर परिषदेच्या स्थावर विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आली असून, अधिक माहितीसाठी इच्छुकांनी नगर परिषदेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.