बेंगळुरू, 14 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बेंगळुरू येथील एआय इंजिनियर अतुल सुभाषच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी त्याची पत्नी निकिता सिंघानिया हिच्यासह दोघांना रविवारी (दि.15) अटक केली आहे. 34 वर्षीय अतुल सुभाषने पत्नीच्या छळाचा आरोप करत 9 डिसेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी निकिता सिंघानियासह तिची आई निशा सिंघानिया आणि तिचा भाऊ अनुराग सिंघानिया या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यावेळी पोलिसांनी निकिता सिंघानियाला हरियाणातील गुरूग्राम येथून अटक केली आहे. तर निशा सिंघानिया आणि अनुराग सिंघानिया यांना उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे.
https://x.com/ANI/status/1868137642266853783?t=mZgYEJy6upASwzxC7H1zzw&s=19
पत्नीच्या छळाला कंटाळून इंजिनियरची आत्महत्या
दरम्यान, एआय इंजिनियर असलेल्या अतुल सुभाषने सोमवारी (दि.09) बेंगळुरूमधील आपल्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी 24 पानी सुसाईड नोट आणि सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये अतुलने त्याची पत्नी आणि तिच्या नातेवाईकांवर छळाचा आरोप केला होता. तसेच पत्नीने माझ्याविरोधात विरोधात 9 खोटे गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे मागे घेण्यासाठी पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी पैशांची मागणी केली. त्याची पत्नी आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्याला त्रास दिला. या कारणांमुळे आत्महत्या करत असल्याचे त्याने या सुसाईड नोट मध्ये त्याने म्हटले आहे. अतुलच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध खून, लैंगिक गैरवर्तन, पैशासाठी छळ, घरगुती हिंसाचार, हुंडा अशा विविध कलमांतर्गत नऊ गुन्हे दाखल केले होते, असे त्याने या नोटमध्ये सांगितले आहे. तर एका न्यायाधीशाने हे खटले मिटवण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली होती. असा आरोप देखील अतुलने त्याच्या सुसाईड नोटमध्ये केला आहे. तसेच सुभाषने 24 पानांच्या या सुसाईड नोटच्या प्रत्येक पानावर ‘न्याय दिला पाहिजे’ असे लिहिले आहे.
चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी अतुलचा भाऊ विकास कुमार याच्या तक्रारीवरून बेंगळुरूमधील मराठाहल्ली पोलिस ठाण्यात आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला. यामध्ये अतुलची पत्नी निकिता सिंघानिया, त्याची सासू निशा सिंघानिया, त्याच्या पत्नीचा भाऊ अनुराग सिंघानिया आणि त्याच्या पत्नीचे काका सुशील सिंघानिया यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अतुल सुभाषने 2019 मध्ये निकिता सिंघानियाशी लग्न केले. त्यांना एक मुलगा देखील आहे. घटस्फोटानंतर या चारही आरोपींनी अतुल सुभाषवर खोटे गुन्हे दाखल करून हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केली होती, असा आरोप अतुलच्या भावाने या तक्रारीत केला आहे. तसेच मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून अतुलने आत्महत्या केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.