बारामती, 11 मेः बारामती शहरातील साताव चौकात एकावर चार जणांनी जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर घटनेबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गणेश बलभीम धोत्रे (वय 27, रा. नायगावकर हॉस्पिटलच्या मागे बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी गणेश धोत्रे यांच्या तक्रारीवरून सुनिल संभाजी माने, विनोद शिवाजी माने यासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश बलभीम धोत्रे हे जुन्या गाड्यांच्या विक्रीचा व्यवसाय करतात. गणेश धोत्रे हे पुर्वी मटका किंग कृष्णा जाधव यांच्या मटक्याच्या अड्ड्यावर काम करत होते. दरम्यान, कृष्णा जाधव यांचा 2018 मध्ये खून झाला. सदर खून प्रकरणात आरोपी सुनिल माने व विनोद माने हे काही दिवसांपुर्वीच जामीनावर बाहेर आले आहेत. फिर्यादी यांना 9 मे रोजी सायंकाळी सुनिल माने याने मोबाईल फोनवरून साताव चौकात भेटायला बोलवले. सुनिल मानेच्या दहशतीमुळे फिर्यादी तात्काळ त्या ठिकाणी भेटण्यास आला. त्या ठिकाणी सुनिल माने, विनोद माने हे दोन साथीदारांसह पांढऱ्या कारमधून तिथे आले.
फिर्यादीला सुनिल माने म्हणाला की, गाडी विक्रीच्या व्यवसायातून तू खूप पैसे कमावले आहेत, तसेच तुझा मटक्याचा धंदाही जोमात आहे. त्यामुळे तू आम्हाला दोन लाख रुपये आणून दे. यावर फिर्यादीने त्याची गरीब परिस्थिती असल्याचे सांगितले. त्यांना पैसे देण्यात तो असक्षम आहे. त्याच वेळी सुनिल माने याने फिर्यादी गणेश धोत्रेवर तलवारीने वार केले. मात्र गणेश धोत्रेने ते तलवारीचे वार चुकवले. मात्र विनोद माने याने गणेश धोत्रेवर काठीने मारहाण करत खाली पाडले. सुनिल माने याने गणेश धोत्रेच्या नरड्यावर पाय दिला. त्यानंतर इतर दोन साथीदारांनी गणेश धोत्रेच्या खिशातून 13 हजार रुपये काढून घेतले. या घटनेनंतर फिर्यादी गणेश धोत्रे हा खूप भयभीत झाला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद झाली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्याकडे देण्यात आला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद मोहिते, पोलीस निरीक्षक गणेश इंगळे पोलीस अधिकारी सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला आहे. सदर प्रकरणात दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.