विधानसभा निवडणुकीच्या काळात 700 कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई, 21 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात राज्यभरात 700 कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता निवडणूक आयोगाने जप्त केली आहे. याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात 15 ऑक्टोंबर 2024 रोजी विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली होती. तेंव्हापासून राज्यात आचारसंहिता लागू झाली. या पार्श्वभूमीवर, निवडणुकीच्या कालावधीत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी राज्यभरात विविध ठिकाणी नाकाबंदी केली होती.

706.98 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

या नाकाबंदी दरम्यान 15 ऑक्टोंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत राज्यभरातून एकूण 706 कोटी 98 लाख रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. याबाबतची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. याबरोबरच आचारसंहितेच्या काळात राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण 10 हजार 139 तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. त्यापैकी 10 हजार 134 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती देखील निवडणूक आयोगाने दिली आहे.



दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी कालच्या दिवशी मतदान पार पडले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 65.11 टक्के सरासरी मतदान झाले आहे. या मतदानाचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच राज्यात कोणाचे सरकार येणार? याची उत्सुकता देखील वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *