आचारसंहितेच्या काळात 398 कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई, 11 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी 15 ऑक्टोंबरपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून राज्यभरात विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच जागोजागी रस्त्यांवर नाकाबंदी केली गेली आहे. या कारवाईदरम्यान 15 ऑक्टोंबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत एकूण 398 कोटी 40 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये बेकायदा रक्कम, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू इत्यादींचा समावेश आहे. ही कारवाई राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आली आहे. याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

3,734 तक्रारी निकाली

तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2024 या कालावधीत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 3 हजार 764 तक्रारी प्राप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी त्यापैकी 3 हजार 734 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्याची आल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले आहे.

सी-व्हिजिल ॲप काय आहे?

राज्यात सध्या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲप स्टोअरमधून डाऊनलोड करता येत आहे. या ॲप मधून नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. ही तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येते, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *