आचारसंहितेच्या काळात 234 कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई, 03 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 15 ऑक्टोंबर 2024 पासून आचारसंहिता लागू आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून खबरदारी घेतली जात आहे. याकरिता राज्यात निवडणूक आयोग आणि पोलीस यांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच विविध रस्त्यांवर सध्या नाकाबंदी करण्यात आली आहे. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून ते आतापर्यंत या नाकाबंदीदरम्यान बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतची एकूण 234 कोटी 49 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणेकडून ही कारवाई करण्यात आली आहे, याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

https://x.com/CEO_Maharashtra/status/1852344579422556519?t=NaBZ69XYDq2_PAJFuhqHbQ&s=19

2059 तक्रारी निकाली

सोबतच आचारसंहिता लागू झाल्यापासून 15 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2024 या कालावधीत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 2 हजार 62 तक्रारी आल्या असून, त्यापैकी 2 हजार 59 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. तसेच राज्यभरात आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने यावेळी सांगितले आहे.

राज्यात निवडणुकीचे वातावरण

महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यंदा विधानसभेची ही निवडणूक एकाच टप्प्यात पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया समाप्त झाली आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यानंतरच राज्यातील बहुतांश जागांवरील लढतींचे चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *