विधानसभा अध्यक्ष सुनावणी लांबवत आहेत, ठाकरे गटाचा आरोप

मुंबई, 23 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सध्या नियमित सुनावणी सुरू आहे. कालच्या सुनावणीवेळी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष घेण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सोडून जात भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. त्यानंतर सुनील प्रभू यांनी 21 जून 2022 रोजी शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप जारी केला होता.

शरद पवार गटातील ‘यांची’ खासदारकी रद्द करा, अजित पवार गटाची मागणी

त्यांनी हा व्हीप कोणाच्या सांगण्यावरून जारी केला होता? याची चौकशी या सुनावणीत करण्यात आली. सुनील प्रभू यांनी हा व्हीप स्वतःच्या अधिकाराने लावला होता की दुसऱ्याच्या सांगण्यावरून लावला होता? तसेच या व्हीपसाठी उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या होत्या का? यांसारखे अनेक प्रश्न शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना यावेळी विचारले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून टी-20 मालिका

यावेळी सुनील प्रभू यांच्याकडून अपेक्षित उत्तर मिळत नसल्यामुळे, ही सुनावणी वेळेत कशी पूर्ण होणार? असा सवाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला. मला 31 डिसेंबरपर्यंत याप्रकरणाचा निर्णय घ्यायचा आहे. तसेच माझ्या हातात केवळ 16 दिवसांचा अवधी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तर या सुनावणीनंतर ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल नार्वेकर हे सुनावणी लांबवत आहेत. तसेच ते शिंदे गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ वाढवून देत असल्याचा आरोप सुनील प्रभूंनी केला आहे. त्यामुळे यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष आणखी वाढला आहे. तर आमदार अपात्रता प्रकरणाच्या या सुनावणीत सुनील प्रभू यांची आज देखील साक्ष नोंदविण्यात येणार आहे. त्यामुळे याप्रकरणी राहुल नार्वेकर कोणाच्या बाजूने निकाल देणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

One Comment on “विधानसभा अध्यक्ष सुनावणी लांबवत आहेत, ठाकरे गटाचा आरोप”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *