मुंबई, 29 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची उत्कंठा सध्या शिगेला पोहोचली आहे. राज्यातील अनेक मातब्बर नेते या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे नव्हे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज (दि.29) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवशी कोणते नेते त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर विधानसभा निवडणुकीसाठी ही बातमी लिहित असे पर्यंत 4 हजार 681 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
20 नोव्हेंबर रोजी मतदान
राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 22 ऑक्टोबरपासून सुरूवात झाली होती. उमेदवारी अर्ज भरण्यास आज अंतिम तारीख आहे. 30 ऑक्टोंबर रोजी या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची मुदत 4 नोव्हेंबर असणार आहे. त्यानंतरच राज्यातील लढतींचे चित्र स्पष्ट होईल.
काही उमेदवारांची घोषणा बाकी
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहेत. यामध्ये महायुतीने आतापर्यंत 279 उमेदवार जाहीर केले आहेत. तर अद्याप 9 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने आतापर्यंत 276 उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांना अजून 12 जागांवर उमेदवार द्यायचे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. अशा परिस्थितीत या राहिलेल्या जागांवर आजच उमेदवार ठरणार, हे नक्की आहे.