विधानसभा निवडणूक; प्रचाराच्या तोफा आज थंडावणार!

पुणे, 18 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज (दि.18) शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजता थंडावणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी काहीच तासांचा अवधी मिळणार आहे. त्यानंतर संबंधित उमेदवारांकडून छुप्या मार्गाने प्रचार केला जाण्याची शक्यता आहे.

बारामतीत दोन्ही पवारांच्या सांगता सभा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी सभा, बैठक आणि रॅलीचा धडका लावला आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या आज जाहीर सभा पार पडणार आहे. यामध्ये आजच्या दिवशी राज्यातील अनेक मतदारसंघात शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे यांसारख्या प्रमुख नेत्यांच्या आज सभा होणार आहेत. दरम्यान, अजित पवारांची आज दुपारी बारामतीत सांगता सभा पार पडणार आहे. ही सभा बारामती शहरातील मिशन हायस्कूलच्या मैदानावर पार पडणार आहे. तर युगेंद्र पवारांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची आज दुपारी बारामती येथील जुना मोरगाव रोड परिसरातील लेंडी पट्टी याठिकाणी सांगता सभा पार पडणार आहे. या सभेत हे नेते काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रचाराचा सुपर संडे

दरम्यान, काल रविवारी सुट्टीचा दिवस होता. कालच्या दिवशी भाजप नेते अमित शाह आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या गडचिरोली येथे जाहीर सभा पार पडल्या. तसेच शरद पवार यांच्या काल माण, फलटण, माढा, पुरंदर आणि इंदापूर याठिकाणी जाहीर सभा पार पडल्या. तर अजित पवार यांनीही काल पारनेर, शिरूर, भोर, कोरेगाव, वडगाव शेरी, गडहिंग्लज येथे जाहीर सभा घेतल्या. सोबतच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे या नेत्यांनी ही सभा आणि रॅलीच्या माध्यमातून काल अनेक ठिकाणच्या मतदारांशी संवाद साधला. त्यामुळे कालचा दिवस निवडणुकीच्या प्रचाराचा खऱ्या अर्थाने सुपर संडे ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *