विधानसभा निवडणूक; उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात

मुंबई, 22 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात विधानसभा निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात 288 जागांसाठी हे मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून (दि.22) सुरूवात झाली आहे. तर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोंबरपर्यंत असणार आहे. 30 ऑक्टोंबर रोजी उमेदवारांच्या अर्जांची छानणी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.

https://x.com/ANI/status/1848598005714415778?t=7RBNLDtOUPc97y1U3Q0gWg&s=19

महाराष्ट्रात 288 मतदार संघात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यामधील 234 जागा या सर्वसाधारण उमेदवारांसाठी आहेत. त्याचवेळी अनुसूचित जमात प्रवर्गासाठी 25 जागा आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 29 जागा राखीव आहेत. तसेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात एकूण 9.63 कोटी अधिक मतदार आहेत. यामध्ये 4.97 कोटी पुरूष आणि 4.66 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. ही आकडेवारी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तेंव्हाची आहे. तर या निवडणुकीसाठी राज्यभरात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत, याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

राजकीय पक्षांची तयारी सुरू

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांच्या 90 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. तर आता भाजपचे मित्र पक्ष असलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष त्यांच्या उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांचा देखील जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे कधी जाहीर केली जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *