मुंबई, 05 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरातील 7 हजार 995 उमेदवारांनी एकूण 10 हजार 905 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्जांच्या छाननीमध्ये त्यातील 7 हजार 73 उमेदवारांचे 9 हजार 230 उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल (दि.04) शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी 2 हजार 938 उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे राज्यातील 288 मतदारसंघात एकूण 4 हजार 140 उमेदवार यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. याबाबतची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
बंडखोरीचा राजकीय पक्षांना फटका?
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी त्यांचे उमेदवार उभे केले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत कालच्या दिवशी समाप्त झाली. यामध्ये अनेक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर अनेक पक्षांच्या बंडखोर उमेदवारांनी त्यांचा अर्ज कायम ठेवला आहे. यामध्ये काही बंडखोर उमेदवारांचा समावेश आहे. अशा बंडखोर उमेदवारांमुळे महाविकास असेल किंवा महायुती यांच्या उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. या बंडखोरीचा फटका अनेक उमेदवारांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघात चुरशीची लढत होण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
20 तारखेला मतदान
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची, अर्जांची छाननी करण्याची तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आता समाप्त झाली आहे. या निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? याकडे राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.