मुंबई, 30 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्याची मुदत मंगळवारी (दि.29) समाप्त झाली आहे. महाराष्ट्रात 288 मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी मुदत संपेपर्यंत 7 हजार 995 उमेदवारांनी एकूण 10 हजार 893 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. या अर्जांची पडताळणी आजच्या (दि.30) दिवशी करण्यात येणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.
https://x.com/ANI/status/1851337377194914299?t=DdSvhsqo8lLF-T_Hp2sXbw&s=19
महायुती 285, माविआचे 286 उमेदवार
दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षाच्या 286 उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज केले आहेत. यामध्ये काँग्रेस 103, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 96 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 87 उमेदवार रिंगणात आहेत. तर त्यांनी उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडल्या आहेत. दुसरीकडे महायुतीच्या तीन प्रमुख पक्षाच्या 285 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये भाजप 149, शिवसेना 81 आणि राष्ट्रवादीने 55 उमेदवार दिले आहेत. तर महायुतीने उर्वरित जागा मित्रपक्षांना दिल्या आहेत.
बंडखोरी रोखण्याचे आव्हान
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बहुतांश पक्षांच्या नाराज उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अशा उमेदवारांची समजूत काढण्याचे आव्हान राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या समोर असणार आहे. यामध्ये त्यांना किती यश मिळते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 तारखेपर्यंत असल्याने, त्यानंतरच कोणत्या मतदारसंघांत कोणता उमेदवार निवडणूक लढणार? हे स्पष्ट होईल.