दिल्ली, 16 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणा राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. जम्मू-काश्मीर येथे 18 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोंबर 2024 रोजी मतदान होणार आहेत. तर 4 ऑक्टोंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच हरियाणा राज्यात 1 ऑक्टोंबर 2024 रोजी मतदान होणार आहे आणि त्याची मतमोजणी 4 ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे, याची माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.
https://x.com/AHindinews/status/1824385674667253839?s=19
https://x.com/AHindinews/status/1824386314290204779?s=19
निवडणूक आयुक्त काय म्हणाले?
जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण 90 मतदारसंघ आहेत. तेथील एकूण मतदारांची संख्या 87.09 लाख आहे. ज्यामध्ये 44.46 लाख पुरूष आणि 42.62 लाख महिला मतदार आहेत. तर जम्मू-काश्मीरमध्ये तरूण मतदारांची संख्या 20 लाख इतकी आहे. हरियाणात देखील एकूण 90 मतदारसंघ आहेत. त्यापैकी हरियाणा मध्ये एकूण मतदारांची संख्या 2.01 कोटी आहे, ज्यामध्ये पुरूष मतदारांची संख्या 1.06 कोटी आहे, तर महिला मतदारांची संख्या 95 लाख आहे. याबाबतची माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. दरम्यान, राजीव कुमार यांनी यावेळी सांगितले की, “जम्मू-काश्मीरमधील पक्षांनी आणखी एक विनंती केली होती की त्यांच्या सर्व उमेदवारांना आणि पक्षाच्या अधिकाऱ्यांना समान सुरक्षा मिळावी जेणेकरून कोणालाही कमी सुरक्षा मिळू नये. सर्व उमेदवारांना सुरक्षा मिळावी यासाठी आम्ही याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.”
महाराष्ट्रात निवडणूक जाहीर झालेली नाही
गेल्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. त्यावेळी जम्मू-काश्मीरचे नाव नव्हते, पण या वर्षी 4 निवडणुका आहेत आणि त्यानंतर लगेचच 5 वी निवडणूक आहे, ज्यात जम्मू-काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्ली यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर, सुरक्षा दलांच्या आवश्यकतेनुसार आम्ही एकाच वेळी 2 निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला आहे. तसेच महाराष्ट्रात अनेक सणही येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.