बारामती, 21 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) बारामतीच्या माळेगाव येथील कृषी विज्ञान केंद्र याठिकाणी सध्या जागतिक दर्जाचे कृषिक 2024 हे कृषी प्रदर्शन सुरू आहे. हे प्रदर्शन 22 जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाचा आज चौथा दिवस आहे. आजच्या दिवशी रविवारची सुट्टी असल्यामुळे हे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी तुफान गर्दी केलेली होती. यावेळी 110 एकरचा परिसर हा प्रदर्शनामध्ये तुडुंब भरलेला होता. आजच्या दिवशी सर्व शेतकरी भाजीपाला पिके, प्रदर्शनात असलेले स्टॉल्स, अंतर्मशागतीचे अवजारे प्रात्यक्षिक, सूक्ष्म सिंचन, त्याचबरोबर मधुमक्षिका पालन, फुलशेती इत्यादी प्रात्यक्षिकांमध्ये माहिती घेताना दिसले.
सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज सकाळी 9 वाजल्यापासूनच शेतकऱ्यांचा ओघ या ठिकाणी वाढलेला होता. शेतकऱ्यांना अडचण होऊ नये अशा पद्धतीचे संस्थेमार्फत नियोजन केलेले होते. आज अश्वप्रदर्शनामध्ये भीमथडी जातीच्या साठहून अधिक अश्व सहभागी झाले होते. उद्या कालवडी स्पर्धा व दुग्धउत्पादन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित केलेला आहे. उद्या 22 जानेवारी रोजी या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. त्याची तयारी केंद्रामार्फत पूर्ण झालेली आहे.