देशात पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, पंतप्रधान मोदींनी मतदारांना नवीन रेकॉर्ड करण्याचे आवाहन केले

दिल्ली, 19 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरूवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 102 जागांसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मतदारांना नवीन रेकॉर्ड तयार करण्याचे आवाहन केले आहे. जनतेने मोठ्या संख्येने मतदान करावे. लोकशाहीत प्रत्येक मत मौल्यवान आहे आणि प्रत्येक आवाज महत्वाचा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी देखील जनतेला जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

नरेंद्र मोदींनी काय म्हटले?

“लोकशाहीचा सर्वात मोठा सण आजपासून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान होणार आहे. या सर्व जागांच्या मतदारांना मी आवाहन करतो की, त्यांनी मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा नवा विक्रम निर्माण करावा. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या माझ्या तरूण मित्रांना माझे विशेष आवाहन आहे की, त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. लोकशाहीत प्रत्येक मत मौल्यवान असते आणि प्रत्येक आवाज महत्त्वाचा असतो!” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

 

राहुल गांधी आणि अमित शाह यांचे आवाहन

“देशात पहिल्या टप्प्यातील मतदान होत असताना आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मी या टप्प्यातील सर्व मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन करतो, कारण तुमच्या एका मतात सुरक्षित, विकसित आणि स्वावलंबी भारत घडवण्याची ताकद आहे. तुमचे एक मत हे केवळ एका लोकसभा किंवा उमेदवाराचा निकाल ठरवण्यासाठी नाही तर भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे.” असे अमित शाह या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. “आज मतदानाचा पहिला टप्पा आहे! लक्षात ठेवा, तुमचे प्रत्येक मत भारताच्या लोकशाहीचे आणि भावी पिढ्यांचे भवितव्य ठरवणार आहे. त्यामुळे बाहेर पडा आणि गेल्या 10 वर्षात देशाच्या आत्म्याला लागलेल्या जखमांवर मताचा मलम लावून लोकशाही बळकट करा,” असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *