दिल्ली, 18 मे: (विश्वजीत खाटमोडे) आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी पीए विभव कुमारला आज दुपारी दिल्ली पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. यावेळी विभव कुमारला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने पाठवलेल्या ईमेलचा आयपी ॲड्रेस ट्रेस केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी विभव कुमारचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. विभव कुमारला आज कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दरम्यान स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर विभव कुमारला पीए पदावरून बडतर्फ करण्यात आले.
https://x.com/ANI/status/1791730171793600841
स्वाती मालीवाल यांचे आरोप
दरम्यान, स्वाती मालीवाल यांच्यावर 13 मे रोजी हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी स्वाती यांनी अरविंद केजरीवाल यांच्या माजी पीएवर गंभीर आरोप केले होते. विभव कुमारने आपल्याला मारहाण तसेच शिवीगाळ केली असल्याचे स्वाती मालीवाल यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी याप्रकरणी विभव कुमारच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलीस विभव कुमारच्या शोधात होते. विभव कुमार हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, दिल्ली पोलीस आज अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी विभव कुमारला अटक केली.
विभव कुमारने तक्रारीत काय म्हटले?
तर दुसरीकडे विभव कुमारने देखील स्वाती मालीवाल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याने दिल्ली पोलिसांना ईमेल पाठवून तक्रार केली होती. स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अनधिकृतपणे प्रवेश करून सुरक्षेचा भंग केला. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गोंधळ घातला, असे आरोप विभव कुमारने या तक्रारीत केले आहेत. स्वाती मालीवाल ह्या खोटे आरोप करून आपल्याला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील विभव कुमारने यामध्ये म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी विभव कुमारने पाठवलेल्या या ईमेलचा आयपी ॲड्रेस पोलिसांनी ट्रॅक केला होता. त्यानंतर अखेर विभव कुमारला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आहे.