अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरूंगात आत्मसमर्पण, 5 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

दिल्ली, 02 जून: (विश्वजीत खाटमोडे) कथित दारू घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद यांनी आज तिहार तुरूंगात आत्मसमर्पण केले आहे. दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना आज 5 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने 1 जूनपर्यंत जामीन दिला होता. त्यावेळी कोर्टाने केजरीवाल यांना 2 जून रोजी शरण येण्यास सांगितले होते. त्यानुसार, ते आज दिल्लीच्या तिहार तुरूंगात हजर झाले.

https://twitter.com/AHindinews/status/1797238326757360088?s=19

https://twitter.com/AHindinews/status/1797239057778352499?s=19

न्यायालयीन कोठडी सुनावली

याच्याआधी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टात प्रकृतीच्या कारणास्तव जामीनाची मुदत वाढवून देण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर शनिवारी (दि.01) सुनावणी झाली. परंतु कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या जामीनावरील निर्णय 5 जूनपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे कोर्टाने केजरीवाल यांना आज 5 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर कोर्ट आता त्यांना जामीन देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

https://twitter.com/AHindinews/status/1797219205927866467?s=19

कोणताही घोटाळा केला नाही

आत्मसमर्पण करण्याआधी अरविंद केजरीवाल यांनी त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाच्या मंत्र्यांनी आज राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील हनुमान मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली. याप्रसंगी केजरीवाल म्हणाले की, “निवडणूक प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने मला 21 दिवसांचा जामीन दिला होता. यासाठी मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानू इच्छितो. आज मी पुन्हा तिहार तुरूंगात जात आहे. या 21 दिवसांत मी एक मिनिटही वाया घालवला नाही. मी दिल्लीतील जनतेला सांगू इच्छितो की, मी कोणताही घोटाळा केला नाही, तर मी हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवला आहे, म्हणून मी पुन्हा तुरूंगात जात आहे. माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे पंतप्रधान मोदींनी देशासमोर मान्य केले आहे,” असे अरविंद केजरीवाल यावेळी म्हणाले.

https://twitter.com/AHindinews/status/1797219942548324821?s=19

एक्झिट पोल खोटे असल्याचा दावा

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी काल सर्व मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर काही खाजगी वाहिन्यांनी त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले. या पोलनुसार देशात पुन्हा एकदा भाजप आणि एनडीएचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी हे सर्व एक्झिट पोल खोटे असल्याचे म्हटले आहे. “2024 च्या लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल काल समोर आले. हे सर्व एक्झिट पोल खोटे आहेत. एक्झिट पोलने राजस्थानमध्ये भाजपला 33 जागा दिल्या होत्या, तर तिथे त्यांना फक्त 25 जागा मिळाल्या आहेत. त्यांना मतमोजणीच्या 3 दिवस आधी बनावट एक्झिट पोल का काढावे लागले हा खरा मुद्दा आहे. याबद्दल अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक म्हणजे ते ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न करत आहेत.” असे अरविंद केजरीवाल यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *