अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामीन 7 दिवसांनी वाढवण्याची केली विनंती

दिल्ली, 27 मे: (विश्वजीत खाटमोडे) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामीन 7 दिवसांनी वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. कथित दारू घोटाळा प्रकरणात अरविंद यांना सुप्रीम कोर्टाने 1 जूनपर्यंत जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे केजरीवाल यांना 2 जून रोजी त्यांना आत्मसमर्पण करावे लागेल. या पार्श्वभूमीवर, अरविंद केजरीवाल यांनी आज पुन्हा एकदा जामीनाचा कार्यकाळ वाढविण्याची विनंती सुप्रीम कोर्टात केली आहे.

https://twitter.com/ANI/status/1794934550373732460?s=19

म्हणून जामीन वाढविण्याची विनंती

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अनेक वैद्यकीय चाचण्या कराव्या लागणार आहेत. त्यामुळे या चाचण्या करण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे अंतरिम जामीन 7 दिवसांनी वाढवण्याची मुदत मागितली आहे. असे आम आदमी पार्टीतर्फे सांगण्यात आले आहे. कथित दारू घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल सध्या अंतरिम जामिनावर तुरूंगाबाहेर आहेत. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला होता. केजरीवाल हे या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करू शकतील. परंतु, मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल आपली अधिकृत जबाबदारी पार पाडू शकत नाहीत, असे सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन देताना म्हटले होते.

21 मार्च रोजी अटक केली होती

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणी ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती. अटकेपूर्वी केजरीवाल यांना ईडीने 10 वेळा समन्स बजावले होते. मात्र, तरी देखील केजरीवाल हे ईडी समोर हजर झाले नाहीत. त्यानंतर ईडीने केजरीवाल यांना अटक केली. सुप्रीम कोर्टाने 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तसेच कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना 2 जून रोजी कोणत्याही परिस्थितीत आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. तर आता अरविंद केजरीवाल यांच्यावतीने जामीनाची मुदत वाढविण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या या याचिकेवर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *